जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

आंबोलीत भात उत्पादनात ५५ ते ६० टक्के घट

दादा सारंग • 28 October 2026, 05:53 AM

आंबोली प्रतिनिधी ✍️: येथील सर्व्हे नं. १०३अ/७ब मध्ये घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला पर्यवेक्षण अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. आखणी करण्यात आलेल्या प्लॉटमधील भात पिकाची प्रत्यक्ष कापणी करून त्यातून मिळालेल्या उत्पादनाचे वजन करण्यात आले. या प्रयोगातून यंदा भात उत्पादनात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले.




सामान्य परिस्थितीत या प्लॉटमधून सरासरी प्रतिगुंठा ५० किलो भात उत्पादन अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्ष कापणीनंतर केवळ १९ किलो उत्पादन मिळाले. त्यामुळे यंदा भात उत्पादनात सुमारे ५५ ते ६० टक्क्यांची घट झाली असून, अपेक्षित उत्पादनाच्या केवळ ४० ते ४५ टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले आहे.




अल निनोच्या प्रभावामुळे वाढलेले तापमान तसेच भात पिकाच्या पोटरी अर्थात फुलोऱ्याच्या अवस्थेत झालेला कमी पाऊस याचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. परिणामी भात उत्पादनात मोठी घट झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आले आहे.




दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होण्यास या कापणी प्रयोगाची मदत होणार असून, त्याआधारे शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळण्यासही हातभार लागणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी सहाय्यकांनी ई-पीक पाहणीची कार्यवाही तसेच महसूल अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.




यावेळी मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी नंदकुमार ढेरे, पीक पाहणी सहाय्यक शशिकांत गावडे, काशिराम गावडे, विमा प्रतिनिधी आशिष आईर, सचिन कांबळे, सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक मुकुंद मराठे, शेतकरी सत्वशिला गावडे, कोतवाल लाडू गावडे आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)