जालना प्रतिनिधी✍️ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध आरोग्य सुविधा मिळाव्यात, तसेच शासकीय आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने राज्यभर आरोग्य संवाद यात्रा राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांमधील सुविधांची प्रत्यक्ष स्थिती, उपचारांचा दर्जा आणि रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. या कामाचा पुन्हा तीन महिन्यांनी आढावा घेऊन झालेल्या सुधारणांची पडताळणी केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
अंबड येथे २३.८४ कोटी रुपये खर्चून श्रेणीवर्धित करण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील नव्या सुविधांची पाहणी करून आरोग्य विभागाने नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन अधिक प्रभावी आणि दर्जेदार सेवा द्यावी, अशा सूचना केल्या.
आरोग्य विभागामार्फत विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा अपेक्षित लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे योजनांवर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये किती सुसंगती आहे, हे तपासणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, उपचारांचा दर्जा कसा आहे आणि कामकाजात कोणत्या त्रुटी आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी करून सुधारणा केल्या जाणार असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
तीन महिन्यांनी कामाचा हिशेब तपासणार
आरोग्य संवाद यात्रेदरम्यान विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन रुग्णांच्या समस्या, उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. या पाहणीनंतर तीन महिन्यांनी पुन्हा संबंधित संस्थांच्या कामकाजाची तपासणी केली जाईल. या कालावधीत किती सुधारणा झाल्या, किती रुग्णांना उपचार मिळाले आणि शासकीय योजनांचा लाभ किती नागरिकांपर्यंत पोहोचला, याची माहिती घेतली जाणार आहे. सार्वजनिक पदाचा उपयोग हा जनतेच्या सेवेसाठीच झाला पाहिजे, या भावनेतून आरोग्य विभागाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात १५ ऑगस्ट रोजी ११५ रुग्णालयांचे लोकार्पण करण्यात आले असून, आगामी काळात आणखी १२५ आरोग्य मंदिरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. केवळ भव्य इमारती उभारणे म्हणजे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्या ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष दर्जेदार उपचार मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. खासगी रुग्णालयांमधील महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करून नागरिकांना शासकीय रुग्णालयांतच प्रभावी वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही शासन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत करीत आहे. संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही संवेदनशीलता, जबाबदारी आणि विश्वासाच्या भावनेतून रुग्णसेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांचे स्वागत
कार्यक्रमादरम्यान हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झालेल्या बालकांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) बालकांच्या हृदयविकारांवरील शस्त्रक्रियांसह आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आमदार नारायण कुचे यांनी आपल्या मनोगतात अंबड येथे आधुनिक सुविधांनी युक्त भव्य उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक स्तरावर राहून रुग्णांना सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनीही आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवून रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्याचे आवाहन केले.
यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया गृह, अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी विभाग तसेच प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले, तर विजय बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.