जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा

दादा सारंग • 30 October 2026, 05:36 AM

मुंबई प्रतिनिधी✍️: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यक सुधारणा करून नव्याने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.




अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, लाभार्थी बालकांची उपस्थिती तसेच गृहभेटी या प्रमुख निकषांचा विचार करून प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्याच्या दृष्टीने सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.




राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसह गर्भवती मातांच्या पोषण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारे सेविकांना दरमहा १,५०० ते २,००० रुपये, तर मदतनीसांना ५०० ते १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आली आहे.




दरम्यान, बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.




बैठकीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वी. रा. ठाकूर यांच्यासह महिला व बालविकास विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)