जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

बाबुराव धुरी यांच्यावर गोवा शिवसेनेची धुरा; उद्धव ठाकरेंकडून संपर्कप्रमुखपदी नियुक्ती!

दादा सारंग • 28 November 2026, 09:07 AM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत सिंधुदुर्गचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे गोवा राज्य संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.




सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करताना बाबुराव धुरी यांनी जिल्हाप्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संपर्क याचा अनुभव आता गोवा राज्यातील संघटना बळकट करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. गोव्यात पक्षाचा जनाधार वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे आणि पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.




सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी शिवसैनिकाला थेट गोवा राज्याच्या संघटनात्मक जबाबदारीची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्यातील भौगोलिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक जवळीक लक्षात घेता या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.




सिंधुदुर्गच्या राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या बाबुराव धुरी यांच्यावर आता गोव्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याची जबाबदारी आली आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीमुळे गोव्यातील पक्षसंघटनेला कितपत बळ मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)