रत्नागिरी प्रतिनिधी✍️: भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि शाश्वत पाणी नियोजनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ उत्साहात पार पडली. या परिषदेला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भविष्यातील पाणीटंचाई, पाणी नियोजन’ हा परिषदेचा मुख्य विषय होता.
वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, पावसाच्या अनिश्चित स्वरूपामुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि जलस्रोतांवर वाढत असलेला ताण लक्षात घेता भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी आतापासूनच शाश्वत नियोजन करणे आवश्यक असल्याचे परिषदेत अधोरेखित करण्यात आले.
परिषदेत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पातळीत वाढ, नैसर्गिक व पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक जलस्रोतांचे जतन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाणी व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात आला.
आमदार प्रमोद जठार यांनी परिषदेला उपस्थित राहून जलप्रश्नाशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. प्रशासन, जलक्षेत्रात कार्यरत संस्था, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक तसेच नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास जलसंधारणाच्या कामांना अधिक व्यापक स्वरूप मिळू शकते, असा सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे, उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या परिषदेतून ‘पाणी वाचवा, पाणी जपवा आणि भविष्यासाठी पाणी सुरक्षित ठेवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.