कुडाळ प्रतिनिधी✍️ : आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर कुडाळच्या ‘चिमणी पाखरं डान्स अकादमी’च्या नऊ कलाकारांनी थेट मुंबईच्या सांस्कृतिक मंचावर आपली कला सादर करत सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि ‘लावणी किंग’ म्हणून ओळख असलेल्या आशिष पाटील यांच्या ‘गोंधळी’ या नृत्य कार्यक्रमात या कलाकारांना नृत्य सादरीकरणाची संधी मिळाली. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे या नऊ कलाकारांनी आशिष पाटील यांच्यासोबत नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विशेष म्हणजे, रवी जाधव दिग्दर्शित आणि येत्या १४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलवरा’ या मराठी चित्रपटातही हेच नऊ कलाकार नृत्य करताना दिसणार आहेत. त्यांच्या या दुहेरी यशामुळे कुडाळमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शुक्रवारी या कलाकारांचे स्वागत रॅली काढून जल्लोषात करण्यात आले.
कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ‘चिमणी पाखरं डान्स अकादमी’ने यापूर्वीही आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली आहे. दोन वर्षांपूर्वी अकादमीची नृत्यांगना दीक्षा नाईक हिची आशिष पाटील यांच्या ‘सुंदरी’ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती. त्यानंतर आशिष पाटील यांनी कुडाळला भेट देत अकादमीतील कलाकारांच्या नृत्यकलेचा अनुभव घेतला. त्यांच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन त्यांनी आणखी आठ कलाकारांना आपल्या ‘गोंधळी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली.
त्यानुसार मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात दीक्षा नाईक हिच्यासह संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, तनिषा नाईक, विशाखा धामापूरकर, अंतरा ठाकूर, सलोनी सावंत आणि प्राची जाधव या नऊ कलाकारांनी आशिष पाटील यांच्यासोबत नृत्य सादर केले. स्थानिक पातळीवर नृत्याचे धडे घेतलेल्या या कलाकारांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सांस्कृतिक मंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळणे ही कुडाळसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशात आणखी भर पडली असून, रवी जाधव दिग्दर्शित आगामी ‘फुलवरा’ या मराठी चित्रपटातही या नऊ कलाकारांना नृत्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अकादमीतील कलाकारांनी आता चित्रपटसृष्टीतही आपली पावले रोवण्यास सुरुवात केली आहे.
या यशस्वी कलाकारांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळमध्ये आगमन होताच नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. सुरुवातीला अकादमीचे संचालक व कोरिओग्राफर रवी कुडाळकर आणि रंगकर्मी बंड्या जोशी यांनी कलाकारांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कुडाळवासीयांच्या वतीने बंड्या जोशी यांनी सर्व नृत्यकलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरणात या कलाकारांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. टेम्पोतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून आणि शुभेच्छांचा वर्षाव करून स्वागत केले. यावेळी कलाकारांनी आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली.
दीक्षा नाईक हिच्यानंतर ‘चिमणी पाखरं’चे आणखी आठ कलाकार चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे अकादमीचे संचालक आणि कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या स्वागत मिरवणुकीची सांगता कुडाळ हायस्कूल येथे झाली. संपूर्ण मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी कलाकारांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. यावेळी ‘चिमणी पाखरं’ अकादमीचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.