जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

चिपळूणचा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल वाहतुकीच्या चाचणीवर; महिनाभरात दोन्ही मार्गिका खुल्या होण्याची शक्यता!

दादा सारंग • 28 November 2026, 10:48 AM

चिपळूण प्रतिनिधी✍️ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पुलावरून एकदिशा वाहतुकीचा प्रयोग सुरू करण्यात आला असून, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना गुरुवारी सायंकाळी दोन तास आणि शुक्रवारी (दि. २७) दिवसभर या मार्गावरून प्रवास करण्याची संधी देण्यात आली. या वाहतुकीच्या माध्यमातून पुलावरील भराव आणि नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणाची तांत्रिक चाचणी घेण्यात आली.




मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल १७ वर्षांपासून रखडलेले असताना चिपळूणमधील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाणे ही वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरत आहे. बहादूरशेख ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंतचा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. तर प्रांताधिकारी कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंतच्या भागातही भराव टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन ते वीस फुटांपर्यंत भराव टाकून त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.




पूल दुर्घटनेनंतर नव्या आराखड्यानुसार काम




दरम्यान, दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख येथे उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याचे काम सुरू असताना पूल कोसळण्याची गंभीर दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर पुलाच्या बांधकामाचा आराखडा आणि कामाच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर नव्या आराखड्यानुसार पुलाचे काम पुन्हा पुढे नेण्यात आले. बांधकामाच्या दर्जावर विशेष लक्ष देत उर्वरित काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.




डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तांत्रिक चाचण्या




पंचायत समितीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील भराव आणि डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता त्याच्या मजबुतीची तपासणी सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १५ ते २० दिवसांत पुलावर नियंत्रित पद्धतीने वाहतूक सुरू ठेवून रस्त्याची तांत्रिक क्षमता तपासली जाणार आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून गुरुवार आणि शुक्रवारी एकदिशा वाहतुकीची चाचणी घेण्यात आली.




दुसरीकडे, गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरही भराव टाकणे आणि डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर या मार्गिकेचीही तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. पुलावरील विद्युत दिवे पुढील दोन दिवसांत सुरू करण्याचे नियोजन असून, भरावाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक संरक्षक कठडे बसविण्याचे कामही पूर्ण केले जाणार आहे.




पुलाच्या उर्वरित कामांसह सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर येत्या महिनाभरात हा उड्डाणपूल दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून, मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांचा प्रवासही अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलाच्या पूर्णत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)