कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला चार दिवस उलटूनही जिल्हाधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी न आल्याने ग्रामस्थांच्या नाराजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मान्य करून उपोषण सोडविण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली.
या शिष्टमंडळात कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेते शिरीष सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसे जिल्हाप्रमुख धिरज परब, श्री. दळवी आदींचा समावेश होता.
पिंगुळीतील ऐतिहासिक पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अद्याप उपोषणस्थळी न आल्याबद्दल शिष्टमंडळाने त्यांच्याकडे विचारणा केली. ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाच्या रेखांकनाबाबत तसेच विकासकाच्या बांधकामाला स्थगिती देण्याचे अधिकृत पत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.