जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक पटलावर नेण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’

दादा सारंग • 30 October 2026, 06:42 AM

मुंबई प्रतिनिधी✍️: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवाशी निगडित परंपरा, संस्कार, प्रथा तसेच पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या आठवणी जगभर पोहोचविण्यासाठी ‘Bappa.org’ हे डिजिटल व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.




‘Bappa.org’ आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९० दिवसांच्या ‘बाप्पाचा कट्टा’ या सांस्कृतिक उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील बँडस्टँड येथे करण्यात आला. यावेळी अभिनेते अमेय वाघ, चित्रपट निर्माते, लेखक व अभिनेते निपुण धर्माधिकारी तसेच ‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक आणि ई-फ्लॅगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद अष्टेकर उपस्थित होते.




गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता कला, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय भावनेचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. या उत्सवाशी जोडलेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचविणे गरजेचे असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.




‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठावर नागरिकांना गणेशोत्सवाशी संबंधित आपल्या आठवणी, कथा, छायाचित्रे तसेच प्रथा-परंपरांची माहिती नोंदविता येणार आहे. या माध्यमातून गणेशोत्सवाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल ‘कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट’ प्रदान करण्यात येणार आहे.




‘बाप्पाचा कट्टा’ या उपक्रमांतर्गत उखाणे, म्हणी, ओव्या, पारंपरिक खेळ तसेच विविध कलाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. ऑनलाइन प्राथमिक निवडीनंतर निवड झालेल्या कलाकारांना प्रत्यक्ष सादरीकरणाची संधी दिली जाणार असून, विजेत्यांना पारितोषिके आणि करंडक प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन होऊन ती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.




अभिनेते निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनीही संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम साधून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचविण्याचे आवाहन केले.




दरम्यान, ‘Bappa.org’चे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांनी नागरिकांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या डिजिटल व्यासपीठाशी जोडले जाऊन गणेशोत्सवाशी संबंधित आपल्या कथा, आठवणी आणि परंपरांची नोंद करावी, असे आवाहन केले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)