जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर मंत्री. रवींद्र चव्हाण यांना निवेदन

दादा सारंग • 28 October 2026, 05:40 PM

मुंबई प्रतिनिधी✍️: गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नाला विधिमंडळात प्रभावीपणे वाचा फोडावी, या मागणीसाठी संयुक्त मराठी मुंबई संघाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.




आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यासाठी भाजपच्या आमदारांनी तारांकित प्रश्न तसेच लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा विषय विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.




गिरणी कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी नागपूर अधिवेशनाच्या काळात मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्या घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, आता हा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये गिरणी कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.




मुंबई शहराच्या उभारणीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळणे आवश्यक आहे. या न्याय्य मागणीसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात गिरणी कामगारांच्या बाजूने आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात आली.




“मुंबईतलं घर आमच्या हक्काचं, हक्क मागतोय; भीक नाही!” या भूमिकेतून गिरणी कामगारांचा लढा सुरूच राहणार असल्याचे संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)