सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने आणि वेगाने कार्यवाही करावी. महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिगारे दिसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नागरिकांकडून विविध पोर्टल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या कचरा व्यवस्थापनासंदर्भातील तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी घनकचरा व्यवस्थापनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची नोंद संबंधित ऑनलाइन पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रत्यक्षात झालेल्या प्रत्येक कामाची माहिती पोर्टलवर प्रतिबिंबित होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरावर या कामांचा दरमहा आढावा घेतला जात असल्याने ग्रामविकास आणि नगरप्रशासन विभागाने याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, राबविलेल्या उपाययोजना आणि केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती संबंधित पोर्टलवर नोंदवावी, असे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्या तसेच कचऱ्याची अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कारवाईचा एकत्रित अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत कचरा टाकण्याची ठिकाणे निश्चित करून त्यांची माहिती संकलित करावी. अधिकृत आणि अनधिकृत कचरा विल्हेवाट स्थळांची ओळख निश्चित करून संबंधित ठिकाणी करण्यात आलेल्या कार्यवाहीची छायाचित्रांसह माहिती तयार करावी, असेही निर्देश देण्यात आले.
घनकचऱ्याचे वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी चार स्तरीय कचरा वर्गीकरण प्रणाली प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संदिप टोपे, क्षेत्र अधिकारी निलेश पाटील, नगरप्रशासन अधिकारी विनायक औंधकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयप्रकाश परब, तहसीलदार चैताली सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच अन्य विभागांचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते.