जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

जनता दरबारातून मंत्री उदय सामंत यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

दादा सारंग • 31 October 2026, 12:29 PM

रत्नागिरी प्रतिनिधी✍️: नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथील जयस्तंभ परिसरातील संपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, मागण्या, समस्या आणि सूचनांची माहिती घेतली.




जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर सामंत यांनी संबंधितांशी चर्चा केली. ज्या समस्या तातडीने सोडविणे शक्य होते, त्यासाठी त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तर प्रशासकीय स्तरावर निर्णय किंवा पाठपुरावा आवश्यक असलेल्या प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणांना लेखी निर्देश देत ते लवकरात लवकर मार्गी लावण्यास सांगितले.




सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या अडचणींना प्राधान्य देणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.




नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता याव्यात आणि त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी जनता दरबाराचे माध्यम प्रभावी ठरत आहे. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी असे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)