जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

दादा सारंग • 26 November 2026, 08:56 AM

मालवण प्रतिनिधी✍️ : सहकार महर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आभाळमाया ग्रुपच्या वतीने रविवार, २९ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर वराडकर हायस्कूल, कट्टा (ता. मालवण) येथे सकाळी ९ ते दुपारी ३.३० या वेळेत होणार आहे.




या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान चळवळीचे पितामह भीष्म म्हणून ओळख असलेले श्री. प्रकाश तेंडोलकर सर यांचे अनुभव ऐकण्याची संधी रक्तदाते व नागरिकांना मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत त्यांचे मार्गदर्शन होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




याशिवाय रॉयल मालवणी ग्रुप सिंधुदुर्ग यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा, होमिओपॅथी चिकित्सा, अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला, दंत चिकित्सा, हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला तसेच जनरल तपासणीचा समावेश आहे.




सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.




या उपक्रमाला स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन, वराडकर हायस्कूल कट्टा आणि जी. एच. फिटनेस यांचे सहआयोजन लाभले आहे. रक्तदात्यांसह परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आभाळमाया ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)