जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

कुडाळ महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला धोका

दादा सारंग • 01 November 2026, 04:57 AM

कुडाळ प्रतिनिधी✍️: कुडाळ येथील महिला व बालरुग्णालयात अग्निशमन यंत्रणेसाठी पाण्याची साठवण टाकी उभारण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. टाकीच्या फाउंडेशनसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे सीएसआर निधीतून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याशिवाय रुग्णालयाच्या पार्किंग व्यवस्थेलाही या कामाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.




या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला व बालरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग यांची भेट घेतली. यावेळी अग्निशमन टाकीच्या कामासाठी करण्यात आलेल्या जागेची निवड आणि कामाच्या नियोजनाबाबत त्यांनी प्रशासनाकडे विचारणा केली.




महिला व बालरुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेसाठी आवश्यक पाण्याची साठवण टाकी उभारण्यासाठी ३ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ३० लाख ८५ हजार ९५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा (एमजीपी) विभागाकडून कामात झालेल्या विलंबामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.




दरम्यान, टाकीच्या फाउंडेशनसाठी खोदण्यात आलेला खड्डा ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीलगत असल्याने इमारतीच्या पायऱ्या खड्ड्यात कोसळल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच टाकीसाठी निवडण्यात आलेल्या जागेमुळे रुग्णालयाची पार्किंग व्यवस्था कायमस्वरूपी बाधित होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.




यावेळी डॉ. तेलंग यांनी एमजीपी विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी तीन पर्यायी जागा दाखविण्यात आल्याचे सांगितल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, भविष्यात रुग्णालयाला निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार न करता कंत्राटदाराला काम करणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने सध्याची जागा निवडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.




या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एमजीपी विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत अग्निशमन पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागा निश्चित करण्याचे ठरले आहे. नवीन जागा निश्चित होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराने बांधकामाचे काम बंद ठेवावे, असे निर्देश वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग यांनी दिले.




यावेळी कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर संघटक सुशील चिंदरकर, कुडाळ तालुका शिवसेना प्रवक्ते बाळा पावसकर आणि काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तरबेज शेख उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)