सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: कोकणातील राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेत महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या भेटीदरम्यान संबंधित चारही रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबे देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा, स्थानकांशी निगडित विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडेही आमदार जठार यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.
कोकणातील प्रवाशांची दैनंदिन गरज आणि रेल्वे प्रवासाचे महत्त्व लक्षात घेता, स्थानिक प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी एक्सप्रेस गाड्यांचे थांबे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केली.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक असलेला पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका आमदार जठार यांनी व्यक्त केली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.