कणकवली प्रतिनिधी✍️ : प्राथमिक आरोग्य स्तरावरील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कौशल्ये अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कनेडी येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला मान्यवरांनी भेट देत विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण पद्धतीचे विशेष कौतुक करण्यात आले.
आरोग्यसेवा महाराष्ट्राचे माजी संचालक तथा CPHC प्रशिक्षण कार्यक्रमाचे मेंटर डॉ. मोहन जाधव आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी येथे भेट देऊन प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली.
या भेटीदरम्यान संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार (NCD) नियंत्रण कार्यक्रम, अॅनिमिया मुक्त भारत अभियान तसेच ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेण्यात आली. या सर्व कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थित अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण केंद्रातील विविध कौशल्याधारित स्किल स्टेशनची पाहणी करत प्रशिक्षणार्थींना दिल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे त्यांनी कौतुक केले. गरोदर माता आणि बालकांच्या पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कल्पक ‘पोषण माह’ उपक्रमानेही मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा CPHC प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, तालुका आरोग्य अधिकारी, कणकवली डॉ. प्रणोती इंगवले, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, कनेडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेस्त्री तसेच सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या CPHC प्रशिक्षण उपक्रमांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि प्रभावी करण्यासाठी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.