जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

कणकवलीच्या दिवाळी बाजाराला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद

दादा सारंग • 06 November 2026, 05:47 PM

कणकवली प्रतिनिधी✍️ : स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजाराला पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून, तर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला मर्यादित स्टॉल्सचे नियोजन असताना विक्रेत्यांच्या उत्साहामुळे येथे ४० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.




उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार साकारण्यात आला आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने स्थानिक उत्पादकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या आयोजनासाठी शहर विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




या बाजारात सुरुवातीला १५ ते २० स्टॉल्स उभारण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विक्रेत्यांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ही संख्या ४० च्या पुढे गेली. मालवण, सावंतवाडी तसेच जिल्ह्यातील अन्य भागांतील व्यावसायिकांनीही येथे सहभाग नोंदवला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहकांचीही बाजारात गर्दी होत आहे.




महिला बचत गटांनी तयार केलेला दिवाळी फराळ, आकर्षक आकाशकंदील, रांगोळ्या, मातीची भांडी, स्टेशनरी तसेच घरगुती आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तू या बाजाराचे आकर्षण ठरत आहेत. स्थानिक हस्तकला आणि घरगुती उत्पादनांना ग्राहक मिळण्याबरोबरच नवउद्योजकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे.




निकोप स्पर्धेतून ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळतील : संदेश पारकर




उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा दिवाळी बाजार आयोजित करण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला असून सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केले आहे. पहिल्याच प्रयत्नाला महिला बचत गट, व्यावसायिक आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद निश्चितच उत्साहवर्धक आहे.




कणकवलीला व्यापार, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आणि कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले शहर म्हणून कणकवलीची वेगळी ओळख आहे. या परंपरेला साजेसा स्थानिक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.




या बाजारामुळे विक्रेत्यांमध्ये निकोप व्यावसायिक स्पर्धा निर्माण होईल. त्याचा फायदा ग्राहकांना होऊन चांगल्या दर्जाच्या वस्तू योग्य किमतीत उपलब्ध होतील. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विक्रेत्यांना वस्तूंचा दर्जा, किंमत आणि सेवेवर विशेष लक्ष द्यावे लागेल. यातून शहरातील व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या वर्षी आयोजनात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या पुढील वर्षी दूर करून अधिक नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात हा बाजार भरविण्यात येईल. वीज, स्वच्छता आणि जागेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली जाईल, अशी ग्वाहीही पारकर यांनी दिली.




स्थानिक अर्थकारणाला बळ देणारा उपक्रम : सुशांत नाईक




उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले की, कणकवलीत पहिल्यांदाच दिवाळी बाजार भरविण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला महिला बचत गट आणि स्थानिक व्यावसायिक या उपक्रमात कितपत सहभागी होतील, याबाबत शंका होती. मात्र, मिळालेल्या प्रतिसादाने नियोजनापेक्षा अधिक स्टॉल्स उभारावे लागले. सुरुवातीला २५ स्टॉल्सचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात ४० हून अधिक विक्रेत्यांनी सहभाग घेतला आहे.




मालवण, सावंतवाडी यांसह विविध तालुक्यांतील व्यावसायिक कणकवलीत आपली उत्पादने घेऊन आले आहेत. महिला बचत गटांच्या वस्तूंनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कणकवली शहरासह आसपासच्या तालुक्यांमधील नागरिक या बाजाराला भेट देत आहेत.




कणकवलीची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी आणि शहरातील आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक खरेदीसाठी कणकवलीत येत असल्याने या दिवाळी बाजाराचा स्थानिक व्यापारालाही फायदा होईल. पहिल्या वर्षी मिळालेल्या अनुभवाच्या आधारे पुढील वर्षी आणखी मोठ्या आणि आकर्षक स्वरूपात दिवाळी महोत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच त्यांनी कणकवलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.




८ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांसाठी दिवाळी खरेदीची संधी




२ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा दिवाळी बाजार ८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना विविध प्रकारच्या दिवाळी साहित्याची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची माहिती घेत त्यांना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.




पहिल्याच वर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे कणकवलीत अशा बाजारपेठेची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह स्थानिक व्यावसायिक आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम भविष्यात कणकवलीच्या दिवाळी उत्सवाचे खास आकर्षण ठरण्याची चिन्हे आहेत.




या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, लोकेश कांबळे, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, दीपिका जाधव, समृद्धी पारकर, प्रसाद अंधारी, कन्हैया पारकर, तेजस राणे, सुजित जाधव, सुदीप कांबळे, वैभव मालवणकर, अमित मयेकर, रामदास मांजरेकर, सौरभ पारकर, साक्षी आमडोस्कर, दिव्या साळगावकर, रीना जोगळे, निलेश वाळके, उमेश वाळके, बबली राणे, पराग म्हापसेकर, पूनम म्हापसेकर, दीक्षा काणेकर, नेहा पारकर आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)