जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

खाजगी रुग्णालयांच्या मनमानी दरांना लगाम घालण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धा

दादा सारंग • 28 November 2026, 11:42 AM

मुंबई प्रतिनिधी✍️ : खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी उपचार शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडत असताना, राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या 'महाराष्ट्र क्लीनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट'च्या मसुद्यात रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याबाबत कोणतीही ठोस तरतूद नसल्याने आरोग्य हक्क चळवळीतील संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कायद्यात आवश्यक बदल करून रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार जन आरोग्य अभियानासह विविध सामाजिक संघटनांनी केला आहे.




यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या 'रुग्ण हक्क संवाद' कार्यक्रमात याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच केंद्र सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांच्या उपचार शुल्काला मर्यादा असणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यात दरनियंत्रणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला असून, रुग्णांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित अनेक बाबींचाही समावेश नसल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.




खासगी रुग्णालयांमधील आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी केवळ कायदा करून चालणार नाही, तर त्यामध्ये प्रभावी अंमलबजावणीच्या तरतुदी असणे आवश्यक आहे. उपचारांचे दर शासनाने निश्चित करावेत, राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदेतील सर्व २० हक्कांचा कायद्यात समावेश करावा, रुग्णालयांनी बिलाच्या कारणावरून मृतदेह ताब्यात ठेवू नये, रुग्णांना उपचारांशी संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, तसेच अनावश्यक उपचारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रमाणित वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक करावीत, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.




या लढ्याला आमदार बच्चू कडू, डॉ. अभय शुक्ला आणि उल्का महाजन यांनीही पाठिंबा दर्शविला. लोकप्रतिनिधींना ज्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतात, त्याच सुविधा सामान्य कामगार आणि मजुरांनाही मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. प्रस्तावित कायदा हा केवळ मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांच्या हिताचा न राहता सामान्य रुग्णांच्या हिताचे संरक्षण करणारा असावा, यासाठी आमदारांच्या भेटी घेऊन विधिमंडळात हा विषय प्रभावीपणे मांडण्याची तयारीही करण्यात येणार आहे.




दरम्यान, खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर शासनाने निश्चित करावेत का, याविषयी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जन आरोग्य अभियानाने राज्यव्यापी ऑनलाइन लोकमतदान मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांचा थेट कौल शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, खासगी रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन आरोग्य हक्क कार्यकर्त्यांनी केले आहे.




या संवाद कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, संयोजक विजय कान्हेकर, दीपिका शेरखाने, लारा जेसानी, जन आरोग्य अभियानाचे विनोद शेंडे, रवी देसाई, दीपक जाधव, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. स्वाती राणे, डॉ. प्रताप, शहाजी गडहिरे, अविनाश कदम, आनंद बाखाडे, मनीषा खिल्लारे आदी उपस्थित होते. जन आरोग्य अभियानासह महिला संघटना, आदिवासी हक्क संघटना आणि रुग्णमित्र संघटनांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अमरावती, नागपूर आणि पालघर यांसह विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनीही उपस्थिती दर्शवली.




सर्वसामान्यांना परवडणारे उपचार, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण आणि खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर सरकारी नियंत्रण, या प्रमुख मुद्द्यांवर आता राज्यभर जनजागृती आणि आंदोलन उभारण्याच्या दिशेने आरोग्य हक्क चळवळीने पाऊल टाकले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)