जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको; उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह १२० जणांवर गुन्हा

दादा सारंग • 28 November 2026, 02:39 PM

लांजा प्रतिनिधी✍️ : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी, वेरळ, वाकेड आणि लांजा शहर परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ आंजणारी बसथांबा येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह सुमारे १२० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाचा मनाई आदेश लागू असताना तसेच पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावलेली असतानाही आंदोलन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.




मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्धवसेनेच्या वतीने बुधवारी आंजणारी बसथांबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी यांचा मनाई आदेश लागू होता. याची माहिती असूनही आणि लांजा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली असतानाही आंदोलन करण्यात आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.




या आंदोलनादरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर ठिय्या मांडण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच ये-जा करणाऱ्या वाहनांना रोखून वाहनचालकांना त्रास दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.




याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितेश राणे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार उद्धवसेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय जयराम कदम (६६), उपजिल्हाप्रमुख रवींद्र भार्गव डोळस (४२), तालुकाप्रमुख मारुती युवराज हांदे (४७), संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप उर्फ बंड्या नंदकुमार बोरुकर (४५), रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे (५६), लांजा उपशहरप्रमुख प्रकाश उर्फ बाबू शांताराम गुरव (५२) आणि युवासेना तालुका अधिकारी अभिजीत अनिल राजेशिर्के (४२) यांच्यासह १०० ते १२० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विलास जाधव करीत आहेत.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)