जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

मुंबईसाठी २०५१, तर पुण्यासाठी २०४७ पर्यंतचे दीर्घकालीन जलनियोजन करा!

दादा सारंग • 21 November 2026, 06:31 AM

मुंबई प्रतिनिधी✍️ : मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारामुळे भविष्यात निर्माण होणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेशासाठी २०५१ पर्यंत, तर पुणे महानगर प्रदेशासाठी २०४७ पर्यंतची पाण्याची मागणी लक्षात घेऊन एकात्मिक, कालबद्ध आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आराखडा तयार करावा. यामध्ये नवीन जलप्रकल्पांसोबतच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण, पर्जन्यजल संचयन आणि पर्यायी जलस्रोतांच्या वापराला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.




मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणी नियोजन व व्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुंबई शहरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




वाढती लोकसंख्या, नागरीकरण, उद्योग आणि डेटा सेंटरच्या वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचा काटेकोर आणि कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यायी जलस्रोतांचा शोध घेऊन प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढविण्यावर भर द्यावा. मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात सुरू असलेले जलप्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावेत. नवीन प्रकल्पांसाठी आवश्यक वन व पर्यावरणविषयक मान्यता, भूसंपादन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया समांतरपणे पूर्ण करून प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.




महानगरपालिका आणि नगरपालिकांनी नियमित जललेखा परीक्षण करावे. पाण्याची आवक, वितरण आणि प्रत्यक्ष देयक आकारणी यामध्ये अचूक ताळमेळ ठेवावा. व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रातील पाणीवापरासाठी स्मार्ट मीटरचा वापर वाढवावा. तसेच महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.




मुंबई महानगर प्रदेशासाठी भातसा, पिंजाळ, तानसा आणि वैतरणा हे विद्यमान जलस्रोत महत्त्वाचे आहेत. मात्र, २०५१ पर्यंत वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता उपलब्ध आणि प्रस्तावित पाणीपुरवठ्यातील संभाव्य तफावत दूर करण्यासाठी आतापासूनच बहुआयामी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी काळू, देहरजी, बाळगंगा, कोंढाणे, खोलसापाडा, शिलार यांसह प्रस्तावित जलप्रकल्पांची कामे मार्गी लावावीत. या प्रकल्पांशी संबंधित वनजमीन, पर्यावरणीय मान्यता, भूसंपादन आणि पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवून आवश्यक परवानग्या प्राप्त कराव्यात आणि प्रत्यक्ष कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.




पुणे महानगर प्रदेशातील पाणी व्यवस्थापनाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांडपाण्याच्या पुनर्वापराचे महत्त्व अधोरेखित केले. सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया (टर्शरी ट्रीटमेंट) करून हे पाणी उद्योग, वीज प्रकल्प आणि डेटा सेंटरसारख्या मोठ्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. तसेच दुय्यम प्रक्रिया केलेले पाणी सिंचनासाठी वापरल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.




पुणे महानगर प्रदेशात पाणीगळती आणि मीटरविना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजना, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी आणि जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती या उपाययोजनांवर भर देण्यात यावा. या माध्यमातून दररोज सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करणे शक्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.




उद्योग आणि डेटा सेंटरसाठी आवश्यक पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण मालकीची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. या कंपनीच्या माध्यमातून नियमित जलस्रोतांबरोबरच महानगरपालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधून उपलब्ध होणारे प्रक्रिया केलेले पाणी घेऊन त्याचे औद्योगिक क्षेत्रात वितरण करण्याची व्यवस्था उभारावी. प्रक्रिया केंद्रांचे संचालन व देखभाल आणि औद्योगिक पाणीपुरवठा यांची एकत्रित यंत्रणा निर्माण करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक तरतुदींचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.




या बैठकीला नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)