जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

महाडीबीटी २.० वर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

दादा सारंग • 30 October 2026, 05:57 AM

मुंबई प्रतिनिधी✍️: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मच्छीमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. योजनेची सुलभ आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मंत्रालयातील मंत्री नितेश राणे यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली.




बैठकीत योजनेची जिल्हानिहाय अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, योजनेची व्यापक प्रसिद्धी करून मच्छीमारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.




मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती राज्यातील मच्छीमारांपर्यंत तळागाळात पोहोचावी, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक संबंधित कार्यालयात हेल्प डेस्क सुरू करून मच्छीमारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया तसेच योजनेच्या लाभाबाबत आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.




राज्यातील जास्तीत जास्त पात्र मच्छीमारांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. योजनेची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.




बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे यांच्यासह विभागातील सर्व प्रादेशिक उपायुक्त आणि सहायक आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)