मुंबई प्रतिनिधी✍️: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली PET-CT स्कॅन ही महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना स्वतःच्या खिशातून महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा भार कमी होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, शासन निर्णयानुसार, ६३ कर्करोग उपचारांचा पॅकेजमध्ये PET-CT तपासणीचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून समावेश केला आहॆ. तसेच १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी 'स्वतंत्र निदान प्रक्रिया' म्हणून या तपासणीला मान्यता देण्यात आली आहे. महागड्या तपासणी खर्चामुळे अनेकदा रुग्ण PET-CT तपासणी पुढे ढकलत किंवा तपासणी टाळत असत. परिणामी आजाराचे स्वरूप समजण्यास आणि योग्यवेळी उपचारांचे नियोजन करण्यास विलंब होतो. ही अडचण लक्षात घेऊन PET-CT तपासणीचा योजनेत समावेश करण्याची मागणी नागरिक व सलग्न रुग्णालया कडून होत होती. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ,योग्य वेळी होतील तसेच रुग्णांना महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोग उपचारांशी संबंधित ६३ उपचार पॅकेजमध्ये PET-CT स्कॅनचा अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add-on Diagnostic Procedure) म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ४४ उपचार पॅकेजमध्ये ही सुविधा समाविष्ट होती. नव्या निर्णयामुळे अशा अतिरिक्त पॅकेजची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या निदान प्रक्रियेची उपलब्धता अधिक व्यापक होण्यास मदत होईल. याशिवाय, वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्तता निश्चित झालेल्या निवडक १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी PET-CT स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया सुरू केली आहे.