जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दादा सारंग • 03 November 2026, 03:08 PM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: महिलांनी विविध क्षेत्रांत स्वतःचा व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि आपल्या कार्यातून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.




या उपक्रमात स्थानिक पातळीवर विविध व्यवसायांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या १२ महिला उद्योजिकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रणया भोसले, स्मिता कासले, भाग्यलक्ष्मी घारे, ज्योती देसाई, सीमा नाईक, सुजाता संदीप देसाई, अक्षता साळगावकर, करिष्मा सोसुरकर, सारिका काळसेकर, सीमा मराठे, प्रणाली अंधारी आणि अस्मिता कुंभार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वेदिका विशाल परब आणि संध्या तेरसे यांच्या हस्ते संबंधित महिला उद्योजिकांना मानपत्र प्रदान करण्यात आले.




महिलांनी केवळ नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत न राहता स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार करताना इतर महिलांसह स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा दृष्टिकोनही महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.




विविध क्षेत्रांत व्यवसाय उभारून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिला उद्योजिकांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. त्यांच्या व्यावसायिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.




कार्यक्रमाला लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, आकांक्षा परब, काजल गिरप आणि दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या.




तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव श्रीया परब, उपाध्यक्ष सई चव्हाण, आरती गिरप, रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, वैभवी दाभोलकर आणि हर्षदा शिरसाट यांची उपस्थिती होती.




महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)