सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील माजी सैनिक सखाराम जगन्नाथ सावंत यांची मुलगी सुचिता हिला या योजनेचा लाभ मिळाला आहे.
सुचिता सावंत ही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये रशियातील ‘केमेरोव्हो स्टेट युनिव्हर्सिटी’ येथे एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या परदेशातील शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत कल्याणकारी निधी योजनेतून एक लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. या मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक सखाराम सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत पात्र शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच अनाथ व अवलंबित पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांमधून शैक्षणिक मदत, पुनर्वसन आणि अन्य स्वरूपाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
जिल्ह्यातील सर्व पात्र आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी तसेच त्यांच्या आश्रितांनी शासनाच्या शैक्षणिक, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनविषयक कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. योजनांची अधिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ०२३६२-२२८८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.