जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

मुख्य सचिवांच्या खाजगी दौऱ्यासाठी तिलारी धरण परिसरात दोन दिवसांत साफसफाईचा धडाका!

दादा सारंग • 23 November 2026, 06:06 AM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना तिलारी जलसंपदा विभागाने मुख्य सचिवांच्या खाजगी दौऱ्यासाठी केलेल्या विशेष तयारीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. धरण परिसरातील अस्वच्छता आणि वाढलेल्या गवत-झाडीबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या विभागाला मुख्य सचिवांच्या भेटीची माहिती मिळताच अचानक जाग आली. अवघ्या दोन दिवसांत परिसरातील रस्त्यांची साफसफाई, गवत व झुडपांची छाटणी, मंडप उभारणी, बैठक व्यवस्था आणि महागड्या पुष्पगुच्छांची तयारी करण्यात आली. या संपूर्ण नियोजनासाठी नेमका किती खर्च करण्यात आला आणि त्यासाठी कोणत्या निधीचा वापर झाला, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे कुटुंबीयांसह गोवा दौऱ्यावर आले असताना रविवारी त्यांनी तिलारी धरणाला खाजगी भेट दिली. या भेटीची माहिती प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच जलसंपदा विभागाची यंत्रणा तातडीने कामाला लागली. मुख्य धरण परिसरात सकाळी साडेनऊ, त्यानंतर अकरा आणि दुपारी एक वाजता संभाव्य भेट होण्याच्या पार्श्वभूमीवर मंडप उभारण्यात आला. धरणाच्या दर्शनस्थळी खुर्च्या, टेबल आणि अन्य बैठक व्यवस्थाही करण्यात आली.




दरम्यान, धरणाचे दर्शनस्थळ, कोनाळ-पुच्छ कालवा परिसर, खळग्यातील धरण परिसर तसेच तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गवत, झाडी आणि झुडपे वाढली होती. या परिसराच्या स्वच्छतेकडे यापूर्वी फारसे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. मात्र, मुख्य सचिवांच्या दौऱ्याची माहिती मिळताच शनिवारपासूनच साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सुमारे १५ ते २० कामगारांच्या मदतीने ग्रासकटरद्वारे गवत कापण्यात आले आणि झाडाझुडपांची छाटणी करण्यात आली. अवघ्या दोन दिवसांत धरण परिसराचे संपूर्ण चित्र बदलण्यात आले.




विशेष म्हणजे, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांच्या भेटीच्या वेळीही अशी तत्परता दिसून येत नसताना केवळ मुख्य सचिवांच्या खाजगी दौऱ्यासाठी एवढी धावपळ कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. धरण परिसराची नियमित स्वच्छता राखण्यासाठी विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध नाही का? नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी अशीच तत्परता का दाखवली जात नाही, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.




या दौऱ्याच्या तयारीतील आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरली आहे. धरण परिसरात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले उद्यान आणि तेथील पाण्याचे कारंजे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. मात्र, याच बंद पडलेल्या कारंज्यावर मुख्य सचिवांच्या स्वागताचा फलक लावण्यात आला. स्वागतासाठी खास डिझाइन केलेले पाच ते सहा महागडे पुष्पगुच्छ तसेच अन्य फुलांचीही व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय मंडप उभारणी आणि बैठक व्यवस्थेवरही खर्च करण्यात आला. एका खाजगी दौऱ्याच्या निमित्ताने सार्वजनिक निधीतून एवढी मोठी तयारी करण्याची गरज काय होती, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.




मुख्य सचिवांच्या या दौऱ्याबाबत जलसंपदा विभागाने कमालीची गुप्तता पाळल्याची चर्चा आहे. पत्रकार आणि सोशल मीडियाला या दौऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. धरण परिसरात उपस्थित असलेल्या पाटील नामक एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना मुख्य सचिवांसोबत केवळ आम्ही दोघेच जाणार असून, कोणत्याही खासगी व्यक्तीला सोडू नका. तसेच कोणी फोटो काढत असल्यास त्यांचा मोबाईल काढून फेकून द्या, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्याचा आरोप केला जात आहे. या कथित वक्तव्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनाची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घ्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.




या खाजगी दौऱ्याच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यामुळे दौऱ्याच्या नियोजनासाठी कोणत्या विभागाने किती खर्च केला, जलसंपदा विभागाने ठेकेदारांमार्फत नेमकी कोणती कामे करून घेतली आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला, याचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.




मुख्य सचिवांच्या भेटीच्या निमित्ताने अवघ्या दोन दिवसांत धरण परिसराचा कायापालट करणाऱ्या जलसंपदा विभागाची ही कार्यतत्परता यापुढेही कायम राहणार का? की वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट संपल्यानंतर पुन्हा एकदा परिसराची अवस्था पूर्वपदावर येणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या नियमित तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेने वरिष्ठांच्या दौऱ्यासाठी दाखवलेली तत्परता सर्वसामान्यांच्या कामांसाठीही दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करून खर्चाचा तपशील जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)