जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

मुळदे ग्रामपंचायतीचा ‘महाराजस्व अभियान’ उपक्रम कौतुकास्पद : तहसीलदार सचिन पाटील

दादा सारंग • 23 November 2026, 05:04 PM

कुडाळ प्रतिनिधी✍️ : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती आणि विविध आवश्यक दाखले गावातच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुळदे ग्रामपंचायतीने राबविलेला ‘महाराजस्व अभियान’ हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. नागरिकांना दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात जाण्याची होणारी धावपळ टाळून गावातच सुविधा उपलब्ध करून देणारे असे उपक्रम सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले. मुळदे येथे आयोजित या अभियानांतर्गत शिबिरात ४९ लाभार्थ्यांनी विविध सेवांचा लाभ घेतला.




ग्रामपंचायत मुळदे आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तहसीलदार कार्यालय कुडाळ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.




यावेळी मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, सरपंच संध्या मुळदेकर, उपसरपंच प्रवीण पालव, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संजय पालव, ग्राममहसूल अधिकारी विद्या अरदकर, पोलीस पाटील रामदास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा पालव, वैशाली पालव, ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरसकर, ग्रामपंचायत कर्मचारी, सीआरपी मंगल म्हापणकर, ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.




यावेळी बोलताना तहसीलदार पाटील यांनी मुळदे ग्रामपंचायतीकडून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे विशेष कौतुक केले. विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यासाठी लागणारे दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायतीने असे उपक्रम सातत्याने राबवावेत. तसेच शेतकऱ्यांनीही शेतीविषयक विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.




मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांनीही शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावातच माहिती, मार्गदर्शन आणि अर्जप्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.




या शिबिरामध्ये जात, उत्पन्न, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व, भूमिहीन शेतमजूर, ईडब्ल्यूएस, वारस, रहिवासी, शेतकरी, डोंगरी, प्रकल्पग्रस्त, अल्पभूधारक आणि नॉन क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध प्रमाणपत्रांसाठी अर्जप्रक्रिया राबविण्यात आली. रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे, नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र तसेच महिलांना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व सुविधांचा ४९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील रामदास चव्हाण यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरसकर यांनी आभार मानले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)