जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
गुन्हेगारी

निर्मला नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

दादा सारंग • 01 November 2026, 10:00 AM

कुडाळ प्रतिनिधी✍️ : माणगाव खोऱ्यातील कालेली धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या वेंगुर्ले भटवाडी येथील ३३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास देवकुंड परिसरात ही घटना घडली. प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.




प्रतिराज कुडपकर हे शनिवारी त्यांचे चुलत भाऊ संतोष कुडपकर आणि एका मित्रासह वेंगुर्ल्याहून माणगाव येथे गेले होते. परिसरात मित्राच्या नातेवाईकांचे घर असल्याने त्यांनी तेथे भेट दिली. त्यानंतर तिघेही कालेली धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रातील देवकुंड परिसरात आंघोळीसाठी गेले.




आंघोळ करत असताना प्रतिराज यांचा अचानक पाय दगडावरून घसरला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते दगडावर आदळले आणि त्यानंतर पाण्यात पडले. पाण्याच्या प्रवाहात ते वाहत गेल्याने चुलत भाऊ आणि मित्राने त्यांना वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि प्रतिराज यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.




घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र भिसे आणि पोलीस नाईक नितीन शेडगे घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे यांनीही घटनास्थळी भेट दिली. माणगाव-कट्टा गावचे पोलीस पाटील सोनू कानडे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.




मृतदेह कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी प्रतिराज यांचे चुलत भाऊ संतोष सुदर्शन कुडपकर यांनी माणगाव पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे.




प्रतिराज कुडपकर हे स्लायडिंगचा व्यवसाय करीत होते. मित्रपरिवारात ते ‘राजू’ या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, भाऊ, भावजय, काका, चुलत भाऊ-बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुडपकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वेंगुर्ले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)