जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीतून हटवा; प्रमोद जठार यांचे स्पष्ट निर्देश

दादा सारंग • 27 November 2026, 04:07 PM

संगमेश्वर प्रतिनिधी✍️ : पक्ष संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करणे अपेक्षित असून, संघटनात्मक कामकाजात निष्क्रिय असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार अशा पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीतून बदलण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी दिल्या.




भारतीय जनता पार्टी संगमेश्वर दक्षिण तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक आमदार प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.




पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांची माहिती डिजिटल माध्यमातून नोंदविण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचे कार्यक्रम आणि विविध उपक्रमांची माहिती नियमितपणे सरल ॲपवर अपलोड करावी, अशा सूचना देण्यात आल्या. भाजपच्या वतीने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या 'सेवा दूत' कार्यक्रमाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या उपक्रमाची जबाबदारी कार्यक्रम प्रमुख अभिजीत शेटे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, तालुक्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या.




आगामी काळात तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकांच्या तयारीवर बैठकीत विशेष चर्चा झाली. अधिकाधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपच्या विचारांचे सरपंच निवडून आणण्याच्या दृष्टीने आतापासूनच गावपातळीवर संघटनात्मक बांधणी करावी, तसेच योग्य नियोजन करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे निर्देश देण्यात आले.




या बैठकीला तालुकाध्यक्ष रुपेश कदम, सरचिटणीस योगेश शिर्के, जिल्हा परिषद गटनेते प्रमोद अडटराव, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा प्रभारी अमित केतकर, अभिषेक शेटये, मुकुंद जोशी, सहदेव जी. बेटकर यांच्यासह तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस, शक्तिकेंद्र प्रमुख, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.




आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेतील जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि गावपातळीवरील संपर्क वाढविणे या मुद्द्यांवर बैठकीत भर देण्यात आला. संघटनात्मक कामकाजाला गती देऊन आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)