जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

नियमबाह्य रंबलर हटवा, स्ट्रीटलाईट वेळेत सुरू करा

दादा सारंग • 27 October 2026, 06:20 AM

वेंगुर्ला स्वरूपा सौदागर✍️: शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टॅण्ड वेंगुर्ला यांच्या वतीने नगरपालिकेला दोन निवेदने सादर करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे.




शहरातील विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेले रंबलर तातडीने हटवावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नियमबाह्य रंबलरमुळे वाहनचालकांना तसेच नागरिकांना त्रास होत असून, वाहतुकीच्या दृष्टीने त्यांचा योग्य आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे.




तसेच शहरातील स्ट्रीटलाईट वेळेवर सुरू करण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी अनेक भागांमध्ये पुरेसा प्रकाश उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्ट्रीटलाईट सुरू करण्याची वेळ निश्चित करून त्यानुसार दिवे नियमितपणे सुरू ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली.




दरम्यान, नगरपालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभांची माहिती नागरिकांना वेळेत देण्यात यावी आणि इच्छुक नागरिकांना सभेच्या कामकाजात सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणीही जय हनुमान मित्रमंडळाने केली आहे. नगरपालिकेच्या कामकाजात नागरिकांचा सहभाग वाढल्यास शहरातील समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, अशी भूमिका मंडळाने मांडली आहे.




या निवेदनांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नगरपालिकेच्या पारदर्शक कामकाजाबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा जय हनुमान मित्रमंडळाने व्यक्त केली आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)