जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

ओंकार हत्तीला नेमळे परिसरातून तातडीने हटवा; ग्रामस्थांचा वनविभागाला आक्रमक इशारा

दादा सारंग • 19 November 2026, 07:10 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: नेमळे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीच्या उपद्रवामुळे आंबा बागायतदार आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तीला तातडीने परिसरातून बाहेर काढावे, अन्यथा फटाके उडवून त्याला हुसकावून लावण्याचा इशारा आंबा बागायतदार आणि लोकप्रतिनिधींनी वनविभागाला दिला. याप्रश्नी ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर शर्मा यांनी नागरिकांनी फटाके न उडवण्याचे आवाहन करत आजपासूनच ओंकार हत्तीला त्याच्या मूळ कळपात परत पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले.




आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरी बागांमध्ये मशागत आणि अन्य कामांसाठी जात आहेत. मात्र, परिसरात हत्तीचा सातत्याने वावर असल्याने बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तीच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयात धाव घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला.




यावेळी ठाकरे शिवसेनेचे मतदारसंघप्रमुख रूपेश राऊळ यांनी हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. हत्तीने झाडांचे नुकसान केल्यास वनविभागाकडून एकदाच भरपाई दिली जाईल; मात्र अनेक वर्षे उत्पन्न देणारे आंब्याचे झाड नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर कुडाळच्या दिशेने गेलेल्या हत्तीला पुन्हा नेमळे गावात का आणण्यात आले, असा संतप्त सवाल पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित केला. याशिवाय, एका वन अधिकाऱ्याने ग्रामस्थांशी उद्धटपणे वर्तन केल्याचा व्हिडिओ दाखवत संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.




फटाके उडवल्यास हत्ती अधिक आक्रमक होण्याची शक्यता




ग्रामस्थांच्या तक्रारींना उत्तर देताना उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी ओंकार हत्तीच्या हालचाली आणि त्याच्या वर्तनाबाबत माहिती दिली. ओंकार हा तरुण हत्ती असून गेल्या तीन वर्षांपासून तो आपल्या कळपापासून दूर आहे. सध्या तो स्वतःच्या कुटुंबाचा शोध घेत असून पुन्हा कळपात जाण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.




सावंतवाडी आणि कुडाळ वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वनविभागाचे पथक नेमळे येथे दाखल झाले असून हत्तीला योग्य दिशा देऊन त्याच्या कळपापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हत्तीभोवती नागरिकांनी गर्दी केल्यास किंवा फटाके वाजवल्यास तो घाबरून अधिक आक्रमक होऊ शकतो. अशा परिस्थितीत हत्ती उधळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके उडवणे किंवा हत्तीला डिवचण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन शर्मा यांनी केले.




हत्ती पकडण्याचा निर्णय न्यायालयाच्या अधीन




ओंकार हत्तीला पकडण्यासंदर्भातील प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली सहा वकिलांची समिती परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि म्हणणे जाणून घेणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल न्यायालयासमोर सादर करणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हत्ती पकडण्याची थेट मोहीम राबविता येणार नसल्याचे उपवनसंरक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले.




हत्तींसाठी कायमस्वरूपी निवासस्थानाचा विचार




हत्तींच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर येथील घाटकरनगर आणि तिलारी परिसरात हत्तींसाठी निवासस्थान अथवा स्वतंत्र कॅम्प उभारण्याचा विचार वनविभागाकडून सुरू आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा, तर चंदगड परिसरात दोन असे एकूण आठ हत्ती आहेत. सन २००२ पासून सुरू असलेल्या हत्तींच्या उपद्रवाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.




ओंकार हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांसह १० खासगी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्वजण दररोज त्याच्या हालचालींवर पाळत ठेवत आहेत.




या बैठकीला पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, माजी पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ, राजू शेटकर, नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, माजी उपसरपंच विक्रम पांगम, नितीन पांगम, लवू चव्हाण, सुहास पिकुळकर, सचिन मुळीक, राजू कोळेकर, लीलाधर राऊळ, बाबी राऊळ, बाळकृष्ण राऊळ, ओंकार राऊळ, निवृत्ती मुननकर, दत्तप्रसाद चव्हाण, राजेश धुरी, सुनील राऊळ, अशोक धुरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)