जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

पाच हजार मिमी पाऊस पडूनही सिंधुदुर्गात पाणीटंचाई; जलसंधारणासाठी लोकसहभाग आवश्यक!

दादा सारंग • 21 November 2026, 01:26 PM

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद होत असतानाही उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणे ही चिंतेची बाब आहे. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य साठा आणि विनियोग करण्यात आपण कमी पडत आहोत. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन या विषयांवर प्रशासनासह नागरिकांनीही एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.




सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल संवाद – उदक चालवावे युक्ती...’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कृषी बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.




जिल्ह्यात मुबलक पाऊस पडत असूनही सिंधुदुर्गचा समावेश दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये होणे ही बाब आपल्या पाणी नियोजनातील त्रुटी अधोरेखित करणारी आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवणे, जुन्या तलावांमधील गाळ उपसणे आणि शहरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करणे यासारख्या उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचे परिणाम कोकणातही जाणवत आहेत. निसर्गामुळे उद्भवणाऱ्या संकटांबरोबरच मानवी निष्काळजीपणामुळे निर्माण होणारी संकटे रोखण्यासाठीही प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले.




जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प प्रशासनाने केला असून, या उपक्रमाला समाजातील विविध घटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, वकील संघटना आणि पत्रकारांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याच्या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. गावोगावी निर्माण झालेली ही जलसंधारणाची चळवळ आणि जनतेने दाखवलेली एकजूट निश्चितच कौतुकास्पद असून, राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.




पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन आणि प्रशासन पूर्णपणे गंभीर असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकार जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊनही प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेऊन अतिरिक्त चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा विचार आहे. सिंधुदुर्गातील अतिरिक्त चारा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच इतर गरजू जिल्ह्यांना पाठवून सहकार्य करता येईल का, याबाबत संबंधित यंत्रणांकडून अभ्यास आणि अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.




तलावांमधील साचलेला गाळ काढल्यास त्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झालेल्या तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास पाणी साठवणुकीबरोबरच भूजल पातळीतही सुधारणा होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि प्रशासन एकत्र येऊन नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.




नळदेवेलसारखे महत्त्वाचे जलप्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात असून, या प्रकल्पाच्या घळभरणीचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय तिलारी परिसरातील प्रकल्पांचे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून आसपासच्या तालुक्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. नळदेवेल प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कणकवलीपासून मालवणपर्यंतच्या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.




राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबवत आहे. संकटाच्या परिस्थितीत नागरिकांमध्ये भीती किंवा निराशा निर्माण होण्याऐवजी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. ‘जल संवाद’सारख्या उपक्रमांमधून जलव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचे विचार, अनुभव आणि प्रभावी उपाय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील. अशा संवादाच्या माध्यमातून भविष्यातही जलसंधारणाची कामे अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)