सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : देशाच्या स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, तहसीलदार (महसूल) चैत्राली सावंत, सांख्यिकी सहायक स्नेहल ठाकरे, नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात सांख्यिकी सहायक स्नेहल ठाकरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर भारताच्या उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती. देशाची राजकीय व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच संविधान निर्मितीला दिशा देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्था, मोठी धरणे आणि वैज्ञानिक संस्थांच्या उभारणीतून त्यांनी भारताच्या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीचा भक्कम पाया घातला. तसेच परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात अलिप्ततावादी चळवळीची स्थापना करून जागतिक स्तरावर भारताची स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली.
पंडित नेहरू यांना लहान मुले अतिशय प्रिय होती. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा बालदिन हा मुलांवरील त्यांचे प्रेम, त्यांच्याविषयीची आत्मीयता आणि त्यांचा आनंदी स्वभाव यांची आठवण करून देतो. अशा महान व्यक्तिमत्त्वांचे विचार आणि आदर्श केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी त्यांनी सर्वांना बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांवर चर्चा घडवून आणणे ही सकारात्मक बाब आहे. अशा चर्चांमुळे त्यांच्या कार्याचा सखोल परिचय होतो, त्यांच्या विचारांचे महत्त्व नव्याने समजते आणि अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते, असेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नमूद केले.