जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

दादा सारंग • 26 November 2026, 07:20 AM

मुंबई प्रतिनिधी✍️: पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने आतापर्यंत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भविष्यातही नियम आणि कायद्याच्या चौकटीत पोलिसांचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांच्या हिताचे आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.




मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद तसेच पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस कुटुंबांच्या सेवेसाठी संघटनेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.




२६ नोव्हेंबर हा संविधान दिन असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचबरोबर मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि निरपराध नागरिकांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्याचाही हा दिवस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.




२६/११ चा दहशतवादी हल्ला हा केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झालेला हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला हल्ला होता. या संकटाच्या काळात पोलीस आणि सुरक्षा दलातील जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत दहशतवाद्यांचा मुकाबला केला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता अजमल कसाबला जिवंत पकडले. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे वास्तव संपूर्ण जगासमोर आले, असे मुख्यमंत्री म्हणाले.




मुंबई तेव्हाही थांबली नव्हती आणि भविष्यातही कधी थांबणार नाही. कोणत्याही दहशतवादी शक्तीला मुंबई, महाराष्ट्र किंवा भारताचा निर्धार संपवता येणार नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळिमा फासणारा होता. भारताच्या जवानांवर किंवा नागरिकांवर होणारा कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून ते सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस भरती, प्रशिक्षण, पोलीस पाल्यांचे प्रश्न तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण या बाबींना शासनाकडून सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. पोलिसांच्या सेवेशी संबंधित प्रश्नांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांच्या हिताचे निर्णय यापुढेही घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)