जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
शैक्षणिक

पाणी अडवा, पाणी जिरवा’ च्या नावाखाली शाळकरी मुलांना ऑक्टोबर हीटमध्ये राबवणं योग्य आहे का?

दादा सारंग • 14 October 2026, 07:05 AM

कुडाळ प्रतिनिधी✍️ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेअंतर्गत ठिकठिकाणी बंधारे बांधले जात आहेत. ही योजना चांगलीच आहे, पण या कामासाठी शाळकरी, लहान-लहान मुलांना कडक ऑक्टोबर हीटच्या उन्हात राबवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि यामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे सरकार ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ च्या गप्पा मारतंय आणि दुसरीकडे त्याच सरकारच्या योजनेसाठी शाळकरी मुलांना मजूर म्हणून वापरलं जातंय. हे कितपत योग्य आहे?

ऑक्टोबर महिन्यातील रणरणत्या उन्हात, ३८-४० अंश तापमानात जिथे मोठ्या माणसालाही काम करणं कठीण जातं, तिथे १०-१५ वर्षांच्या मुलांकडून माती, दगड वाहून बंधारे बांधून घेतले जात आहेत. शाळेच्या वेळेत हे मुलं शाळेत असायला हवीत की उन्हात बंधाऱ्यावर?

या कामासाठी मनरेगा, ग्रामपंचायत किंवा ठेकेदारामार्फत मजूर मिळत नाहीत का? का फुकटात काम करून घेण्यासाठी शाळकरी मुलांचा वापर केला जातोय? या मुलांच्या जीवाला जर उन्हामुळे काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार?

शिक्षणाचा हक्क, बालकांच्या आरोग्याचा हक्क, याचं काय? पाणी अडवायचं आहे मान्य, पण मुलांचं भविष्य अडवून, त्यांच्या आरोग्याशी खेळून का?

जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाने यात तात्काळ लक्ष घालून शाळकरी मुलांना अशा कामात लावण्याचा प्रकार थांबवावा, आणि जे कोणी यामागे असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे.

पाणी जिरवा पण मुलांचं बालपण तरी जिरवू नका अशी प्रतिक्रिया बोलली जात आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)