जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

परुळे गावात गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर कारवाईची मागणी

दादा सारंग • 30 October 2026, 09:15 AM

वेंगुर्ले प्रतिनिधी✍️: परुळे गावात गोवा बनावटीची दारू व बिअरची कथितपणे बेकायदेशीर विक्री सुरू असून, या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख भिकाजी (तात्या) बाळकृष्ण पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.




निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परुळे गावात काही दुकानांमधून गोवा बनावटीची बिअर आणि दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे पोलिसांचे कॅमेरे या परिसरात असूनही त्यांच्यासमोरच दारू विक्री सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.




या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता असून, गावातील शाळा, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांसारखी ठिकाणे दारू विक्रीच्या ठिकाणापासून सुमारे ५० मीटरच्या परिसरात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




दारू विक्रीचे प्रकार तातडीने बंद करून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. तसेच ज्या दुकानांमध्ये अशा प्रकारे दारू विक्री होत आहे, त्या दुकानमालकांवरही नियमानुसार कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात दुकान किंवा गाळा अशा प्रकारच्या व्यवसायासाठी भाड्याने देण्यास आळा बसेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.




या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत आणि बेकायदेशीर दारू विक्रीवर प्रभावी कारवाई करावी, अशी विनंती भिकाजी पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)