जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेना पुन्हा उभी राहील; तिथवली शाखेतून नव्या पर्वाची सुरुवात : मा.आम. वैभव नाईक

दादा सारंग • 24 November 2026, 03:07 PM

वैभववाडी प्रतिनिधी✍️ : राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिवसैनिकांच्या जिद्दीच्या बळावर शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहील. त्याची सुरुवात तिथवली शाखेच्या उद्घाटनातून झाली आहे. या कार्यक्रमाला शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ऊर्जा देणारा असून, या शाखेच्या माध्यमातून गावातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी व्यक्त केला.




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दूधवडकर, माजी आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, धारावी विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, मुंबईचे नगरसेवक किरण तावडे आणि रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.




यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी सुशांत नाईक यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. अनेक सहकारी पक्ष सोडून गेले असतानाही सुशांत नाईक हे कणकवली विधानसभा मतदारसंघात जबाबदारीने काम करत आहेत. जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कामाचे आम्हा सर्वांना कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले.




महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असून, त्याविरोधात शिवसैनिकांनी आवाज उठविण्याची गरज आहे. सिंधुदुर्गातील जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप करत जिल्ह्याचे अस्तित्व आणि अस्मिता टिकविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने या मातीत पाय घट्ट रोवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.




उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ आणि महिला व बाल रुग्णालय यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली, तसेच शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात आली. सत्तेत असताना आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केली. मात्र, सध्याचे सत्ताधारी अदानीच्या स्मार्ट मीटरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आणि जिल्ह्यात विनाशकारी प्रकल्प आणण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.




गेल्या वर्षी आणि यंदाच्या भातशेतीच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मात्र, पालकमंत्री सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत माझ्यामुळेच दुष्काळ जाहीर झाला, असे सांगत कार्यक्रम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू झालेल्या चिपी विमानतळाची महायुतीची सत्ता आल्यानंतर तीन वेळा विमानसेवा बंद पडली. आता बंद पडलेली विमानफेरी पुन्हा सुरू करून आपणच विमानतळ सुरू केल्याचा आव सत्ताधारी आणत आहेत. तसेच मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली रो-रो बोट सेवाही पहिल्याच महिन्यात बंद पडली. केवळ प्रसिद्धीसाठी असे उपक्रम राबविले जात असून, सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून शाश्वत विकासाचे कोणतेही ठोस काम झालेले नाही, असा आरोप नाईक यांनी केला.




वैभववाडी येथे साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या घोषणेला दहा वर्षे उलटूनही कारखान्याचा साधा फलकदेखील उभारण्यात आलेला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.




या कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण रावराणे, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संपर्कप्रमुख विठ्ठल बंड, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, उत्तम लोके, राजापूर विधानसभा प्रमुख तात्या सरवणकर, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, सहसंपर्कप्रमुख पंढरीनाथ तावडे, उपजिल्हा समन्वयक वसंत खानविलकर, तालुका सचिव गुलजार काझी, तालुका संघटक बाबा मोरे, महिला आघाडीप्रमुख दिव्या पाचकुडे, लक्ष्मीप्रभा जाधव, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील, विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, तिथवली शाखाप्रमुख चिंतामण जैतापाकर, बाळू हर्याण, भारती सरवणकर, सुरेश सरवणकर, गोट्या कोळसुलकर, यशवंत गव्हाणकर, स्वप्नील रावराणे, प्रसाद नारकर, मधुकर इरवळकर, प्रमोद हर्याण यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)