जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

प्रदीप पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ मानपाड्यात मेणबत्ती मार्च

दादा सारंग • 31 October 2026, 02:52 AM

ठाणे प्रतिनिधी✍️: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यासाठी मानपाडा येथे मेणबत्ती मार्च काढण्यात आला. हत्येप्रकरणी तपासाला गती देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरात २९ सप्टेंबर रोजी प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी हत्या केली होती. या घटनेला २९ ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण झाला. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असली तरी हत्येमागील मुख्य सूत्रधार कोण आणि हत्येचे नेमके कारण काय, याचा अद्याप उलगडा झालेला नसल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.




या पार्श्वभूमीवर मानपाडा गावातून मेणबत्ती मार्च काढण्यात आला. प्रदीप पूर्णेकर यांची प्रतिमा आणि हातात मेणबत्त्या घेऊन नागरिकांनी या मार्चमध्ये सहभाग घेतला. मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर, कोलशेत, ढोकाळी यांसह घोडबंदर परिसरातील विविध गावांमधून हजारो नागरिक मार्चमध्ये सहभागी झाले होते.




पूर्णेकर यांच्या हत्येनंतर परिसरातील नागरिक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संताप व हळहळ कायम असल्याचे या मार्चमधून दिसून आले. मार्चदरम्यान नागरिकांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, हत्येचा सखोल तपास करावा आणि प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.




मानपाडा गावातून सुरू झालेल्या या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसरात गर्दी झाली होती. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याने अनेक नागरिक भावूक झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि हत्येप्रकरणी ठोस कारवाई व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)