जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा पुन्हा सुरू; वाहनधारकांना पार्किंग शुल्कातून दिलासा!

दादा सारंग • 20 November 2026, 03:51 PM

रत्नागिरी प्रतिनिधी✍️ : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी काही मिनिटे थांबणाऱ्या वाहनधारकांसाठी मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना विनाकारण पार्किंग शुल्क भरावे लागणार नसून, प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.




रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना उतरवण्यासाठी काही मिनिटे थांबणाऱ्या वाहनांकडूनही पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली कथित मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या गंभीर प्रश्नाकडे ठाकरे युवासेनेचे माजी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी लक्ष वेधत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.




या प्रश्नावर युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेतली. रत्नागिरी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी लेखी पत्राद्वारे प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आल्याचे सांगतानाच, प्रस्तावित जनआंदोलन मागे घेण्याची विनंतीही प्रशासनाकडून करण्यात आली.




दरम्यान, पार्किंग ठेकेदाराने रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, तसेच अधिकृत शुल्काचे दरफलक प्रवाशांना सहज दिसतील अशा ठिकाणी लावावेत, अशा स्पष्ट सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास प्रशासनाकडून देखरेख ठेवून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.




रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना काही मिनिटांच्या थांब्यासाठी पार्किंग शुल्काचा आर्थिक भुर्दंड बसू नये, हा मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधेमागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने ही सुविधा पुन्हा सुरू केल्याने प्रवासी आणि वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच ठाकरे युवासेनेने या प्रश्नावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे चित्र आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)