कर्जत प्रतिनिधी✍️ : कर्जत तालुक्यातील साई डोंगर, पाली-कर्जत परिसरात टोरेंट प्रकल्पासाठी करण्यात आलेली वृक्षतोड तसेच पोशिर आणि शिलार धरण प्रकल्पांमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य, वनसंपदा आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, तसेच टोरेंट प्रकल्पासह पोशिर व शिलार धरण प्रकल्प रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे सह्यांची मोहीम आणि कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत सकाळी ११ वाजता कर्जत येथील कपालेश्वर मंदिर येथे सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गावर कँडल मार्च काढण्यात येणार आहे.
‘सह्याद्री वाचवा, साई डोंगर वाचवा, टोरेंट हटवा, कर्जत वाचवा!’ असा संदेश देत या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा आवाज बुलंद करण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, या प्रश्नाकडे प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या सह्यांची मोहिमेत आणि कँडल मार्चमध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी तसेच निसर्गप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन नंदकुमार सावंत यांनी केले आहे. सावंत हे कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख तसेच कर्जत नगरपरिषदेचे माजी गटनेते व नगरसेवक आहेत.