जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

सत्यविजय भिसे यांच्या स्मृतिदिनी सामाजिक उपक्रमांचा जागर; ५२ जणांचे रक्तदान

दादा सारंग • 23 November 2026, 05:59 AM

कणकवली प्रतिनिधी✍️ : कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ आणि भिसे कुटुंबीयांच्या वतीने रविवारी (२२ नोव्हेंबर) शिवडाव येथील राऊतखोलवाडी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर वारकरी संप्रदायातील १५० हून अधिक मंडळींचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचे काम मित्रमंडळ आणि भिसे कुटुंबीयांकडून गेली २४ वर्षे सातत्याने सुरू आहे. रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाचा गौरव आणि अन्य सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून स्मृतिदिनाला समाजोपयोगी स्वरूप देण्यात येते. यंदाही वारकरी संप्रदायाच्या भजनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.




या कार्यक्रमाला माजी खासदार विनायक राऊत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा भिसे, तालुकाप्रमुख राजू राठोड, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, सोमा घाडीगावकर, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, माजी सरपंच सुनीता जाधव, माजी उपसरपंच लवू वाळके, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ गावकर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील, चंदू शिरसाठ, नितीन हरमळकर, मिथिल गावकर, महेश शिरसाठ, मधुकर चव्हाण, नितीन गावकर, निलेश दळवी, रामचंद्र करगुटकर, दीपक कोरगावकर, श्रीकांत तेली, सुनील हरमळकर, प्रेमानंद कोरगावकर, गणेश शिवडावकर, मिलिंद काणेकर, निकेतन भिसे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




सामाजिक कार्याची परंपरा जपणे हीच भिसे कुटुंबीयांची ताकद : वैभव नाईक




जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कै. सत्यविजय भिसे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सत्यविजय भिसे यांच्या दुर्दैवी निधनानंतरही भिसे कुटुंबीयांनी सामाजिक कार्याची वाट सोडली नाही. गेल्या २४ वर्षांपासून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान असे उपक्रम नियमितपणे राबविले जात आहेत. राजकीय क्षेत्रात अनेकदा व्यासपीठावरील माणसे बदलतात; मात्र सामाजिक कार्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवणे ही निश्चितच मोठी गोष्ट आहे.




सत्यविजय भिसे हे अत्यंत कष्टाळू आणि उद्योजकीय दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व होते. स्वतःच्या कष्टातून त्यांनी उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यास सुरुवात केली होती. ते आज असते तर निश्चितच मोठे उद्योजक झाले असते, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. दुर्दैवी प्रसंगानंतरही भिसे कुटुंबीयांनी खचून न जाता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सुरू ठेवले. ज्यांच्यामुळे कुटुंब मोठे झाले, त्यांच्याकडून झालेल्या अन्यायाची कटुता मनात न ठेवता समाजासाठी काम करत राहणे, हीच भिसे कुटुंबीयांची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.




स्मृतिदिन म्हणजे चांगल्या प्रवृत्तींचा जागर : सुशांत नाईक




कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले की, २४ वर्षांपूर्वी घडलेली घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यावेळची राजकीय परिस्थिती, आंदोलनाची तीव्रता आणि समाजातील भावना विसरणे शक्य नाही. स्मृतिदिनाच्या माध्यमातून सत्यविजय भिसे यांच्या कार्याची आठवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम मित्रमंडळ आणि भिसे कुटुंबीय करत आहेत.




गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाचा सन्मान आणि महिला सन्मान असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. वारकरी संप्रदायाच्या भजनातून चांगल्या प्रवृत्तींचा जागर केला जातो. शिवडाव गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील नागरिकांचे राजकीय विचार वेगवेगळे असले तरी स्मृतिदिनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. गावातील ही एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा अशीच कायम राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




सत्यविजय भिसे यांच्या सामाजिक कार्याची ज्योत नव्या पिढीपर्यंत पोहोचावी : विनायक राऊत




माजी खासदार विनायक राऊत यांनी कै. सत्यविजय भिसे यांच्या परोपकारी वृत्तीचे आणि सामाजिक योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की, २४ वर्षांपूर्वी जिल्ह्यात राजकीय गुंडगिरी आणि दहशतीचे वातावरण होते. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय स्वार्थातून लक्ष्य केले जात असल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीत अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील जनतेने एकजुटीने आवाज उठविला होता.




सत्यविजय भिसे हे हसतमुख, खेळकर आणि समाजातील प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर बाळा भिसे यांनी कुटुंबाला आधार देत सामाजिक कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवला. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या माध्यमातून सत्यविजय भिसे यांचे सामाजिक योगदान, परोपकारी स्वभाव आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. नव्या पिढीला सत्यविजय भिसे कोण होते आणि त्यांनी समाजासाठी काय योगदान दिले, याची माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून होत असल्याचे राऊत यांनी नमूद केले.




सत्यविजय भिसे हे स्पष्टवक्ते, निर्भीड आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व होते. अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात देणे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजासाठी स्वतःचा त्याग करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या निधनाने समाजाने एक चांगला कार्यकर्ता गमावला. आजही शिवडावच्या जनतेने भिसे कुटुंबीयांशी असलेले नाते जपले आहे. वेगवेगळ्या राजकीय विचारांचे लोक स्मृतिदिनानिमित्त एकत्र येतात, ही गावाची मोठी ताकद आहे. २४ वर्षे सातत्याने स्मृतिदिन साजरा करणे ही साधी गोष्ट नाही. रक्तदान शिबिर आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान यांसारख्या उपक्रमांतून त्यांच्या कार्याची ज्योत तेवत ठेवली जात आहे. समाजात निस्वार्थीपणे काम करण्याची प्रेरणा या स्मृतिदिनातून मिळत असल्याचे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.




कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ आणि भिसे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या स्मृतिदिन कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी, रक्तदानाचे महत्त्व, वारकरी संप्रदायाप्रती आदर आणि गावातील एकजुटीचे दर्शन घडले. २४ वर्षांनंतरही कै. सत्यविजय भिसे यांच्या आठवणी समाजमनात कायम असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)