जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रेचा कुडाळ तालुक्यात शुभारंभ

दादा सारंग • 29 October 2026, 04:19 PM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️:जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या विविध योजना, सेवा आणि शासकीय उपक्रमांची माहिती गावपातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रेचा’ कुडाळ तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, हिर्लोक येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते या यात्रेचा उत्साहात प्रारंभ झाला.




या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साठविलकर, जन आरोग्य समिती अध्यक्ष रुपेश कानडे, जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर, दीपलक्ष्मी पडते, पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, मान्यवर, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.




उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले. यावेळी त्यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती परब आणि पंचायत समिती कुडाळचे गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर यांचीही उपस्थिती होती.




शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ यांनी आपल्या मनोगतात ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा, शासकीय योजनांची माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन त्यांच्या गावातच मिळावे, तसेच आरोग्य यंत्रणा व नागरिकांमध्ये थेट संवाद निर्माण व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जन आरोग्य समितीचे अध्यक्ष रुपेश कानडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.




अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ उपयुक्त ठरेल, असे सांगितले. आरोग्य विभागाच्या विविध योजना, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, तपासणी आणि उपचार सुविधांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय आरोग्य योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी नमूद केले.




३५० हून अधिक रुग्णांची तपासणी




आरोग्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गनगरीचे १२ तज्ज्ञ डॉक्टर तसेच SSPMचे तज्ज्ञ डॉक्टर शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिरात ३५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.




ग्रामीण भागातच विविध आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.




आयुष्मान कार्ड आणि पोषण किटचे वितरण




कार्यक्रमादरम्यान निक्षय मित्र उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना पोषण किटचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना आयुष्मान कार्डचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बेल नदी ग्रुप, पावशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाळा व अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. आरोग्य आणि पोषणाशी संबंधित सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत की नाही, याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.




ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, विविध शासकीय आरोग्य योजनांची जनजागृती करणे आणि आरोग्य यंत्रणा व नागरिकांमध्ये थेट संवाद वाढविणे, या उद्देशाने ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ महत्त्वपूर्ण ठरत आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)