जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणाची सुविधा

दादा सारंग • 04 November 2026, 05:00 AM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठीची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोशल मीडियावरील ट्विटद्वारे या विमानसेवेची माहिती दिली आहे. त्यानुसार, नवी मुंबई आणि सिंधुदुर्गदरम्यान दररोज विमानाची फेरी होणार असून, त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.




या वेळापत्रकानुसार, नवी मुंबई येथून सकाळी ७.५५ वाजता विमानाचे उड्डाण होईल. हे विमान सकाळी ९.०५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर सिंधुदुर्ग येथून सकाळी ९.२५ वाजता विमान नवी मुंबईच्या दिशेने रवाना होऊन सकाळी १०.३५ वाजता नवी मुंबई विमानतळावर पोहोचेल.




या नियमित विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना आठवड्याचे सातही दिवस हवाई प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ वाचण्याबरोबरच प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळून सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासालाही या विमानसेवेचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)