सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी महाडायलेसिस योजनेंतर्गत सुरू असलेली मोफत डायलेसिस सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देऊ नका, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या सेवेसाठी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच सेवा पुरविणाऱ्या कंपनीची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, जिल्हा महिला रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय पेंडुरकट्टा आणि दोडामार्ग येथे महाडायलेसिस योजनेंतर्गत रुग्णांना मोफत डायलेसिस उपचार दिले जातात. मात्र, ही सेवा पुरविणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि. कंपनीला सेवा पुरविल्याची बिले मिळाली नसल्याने कंपनीने सेवा तात्पुरती बंद करण्याचा इशारा रुग्णालय प्रशासनासह रुग्णांना लेखी नोटिशीद्वारे दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील डायलेसिस रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी मोफत डायलेसिस सेवा अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी संबंधित कंपनीच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून सेवा कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत.
कंपनीच्या जिल्हा समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व संबंधित रुग्णालयांच्या डायलेसिस युनिटसाठी आवश्यक औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्याचा साठा पुढील दोन आठवड्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या कालावधीत रुग्णांना डायलेसिस सेवा नियमितपणे मिळणार आहे.
दरम्यान, संबंधित कंपनीला शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेतून कॉर्पस फंडासाठी केवळ २५ टक्के रक्कम वजा करून उर्वरित संपूर्ण रक्कम अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाने रुग्णालय प्रमुखांना कार्यालयीन पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
कंपनीची थकीत देयके तातडीने मिळावीत, यासाठी शासनस्तरावरही योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाडायलेसिस योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची मोफत डायलेसिस सेवा खंडित होणार नसून ती नियमित सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.