जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

सावंतवाडी नगरपालिका कारभारावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह

दादा सारंग • 27 October 2026, 02:56 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : सावंतवाडी नगरपालिकेच्या विशेष सभेला काही महत्त्वाच्या व्यक्तींनी लावलेली गैरहजेरी तसेच उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांमुळे नगरपालिका कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा योग्य आणि पारदर्शक पद्धतीने विनियोग होत आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. समीर वंजारी यांनी व्यक्त केले.




विशेष सभेमध्ये ऑडिटसंदर्भातील मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित व्यक्तींची उपस्थिती महत्त्वाची होती. मात्र, संबंधितांची अनुपस्थिती राहिल्याने सभेच्या उद्देशावरच प्रश्न निर्माण होत असल्याचे वंजारी यांनी म्हटले आहे.




नगरपालिकेच्या कामकाजासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत वादग्रस्त विषयांवर घाईघाईने निर्णय घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. नगरपालिका प्रशासनाने सर्व बाबी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या भूमिकेवरही अॅड. वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला. यापूर्वी परब यांनी कथित गैरव्यवहारासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता ते पुरावे तसेच संबंधित व्यक्तींची नावे जनतेसमोर आणावीत, असे आवाहन वंजारी यांनी केले.




या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच जिल्हाधिकारी तसेच नगरविकास विभागाकडे निवेदन साद करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. समीर वंजारी यांनी दिली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)