जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

सावंतवाडीच्या जिमखाना मैदानाला राष्ट्रीय क्रिकेटचे व्यासपीठ मिळण्याच्या आशा

दादा सारंग • 29 October 2026, 02:56 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदानाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. या मैदानावर रणजी करंडकासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने आयोजित करता यावेत, यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत (एमसीए) टाय-अप करण्याची योजना आखण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एमसीएचे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांनी जिमखाना मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.




जिमखाना मैदान हे सावंतवाडीतील क्रिकेटपटूंसाठी अनेक वर्षांपासून महत्त्वाचे क्रीडा केंद्र राहिले आहे. मात्र, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सामने आयोजित करण्यासाठी मैदानावर आवश्यक पायाभूत सुविधा आणि क्रीडा सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि नगरपरिषदेचे क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.




एमसीएचे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांच्याकडे पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या जिमखाना मैदानाच्या पाहणीमुळे मैदानाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. भविष्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत अधिकृत करार करून रणजी करंडक, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे.




या माध्यमातून जिमखाना मैदानाचा सर्वांगीण कायापालट होण्याची शक्यता असून, सावंतवाडीतील स्थानिक क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळण्याबरोबरच शहराच्या क्रीडा क्षेत्रालाही नवी दिशा मिळणार आहे.




पाहणी दौऱ्यादरम्यान उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी राहुल शेवाळे यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले. यावेळी नगरपरिषदेचे क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिनेश कुबडे यांच्यासह शहरातील अनेक दिग्गज खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)