जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

शिक्षणातून चारित्र्य घडावे, ज्ञानाचा उपयोग राष्ट्रउभारणीसाठी व्हावा! उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

दादा सारंग • 21 November 2026, 02:01 PM

पुणे प्रतिनिधी✍️ : शिक्षण हे केवळ पदवी संपादन करण्याचे किंवा रोजगार मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य घडविण्याबरोबरच नैतिक मूल्यांची जपणूक करणारे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाजकल्याण आणि राष्ट्रउभारणीसाठी करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.




सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुझुमदार, विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.




यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, व्यावसायिक क्षेत्रात यश मिळविणे महत्त्वाचे असले तरी चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांना तितकेच महत्त्व आहे. आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले तरी आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करू नये. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती कायम ठेवावी, आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करावा.




समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, इतरांच्या प्रगतीत सहभागी होणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणे यातच खऱ्या आनंदाची आणि यशाची अनुभूती मिळते. विद्यार्थ्यांनी जगाच्या कोणत्याही भागात कार्यरत असताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचा अभिमान बाळगावा. आपल्या आचार-विचारांतून आणि कार्यातून देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.




सिम्बायोसिसमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक विद्यार्थीनी असल्याचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी शिक्षण क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले.




दरम्यान, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानामुळे जागतिक स्तरावर वेगाने बदल घडत आहेत. या बदलांचा स्वीकार करताना तंत्रज्ञानाबरोबरच मानवी मूल्ये, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी यांचीही जपणूक करणे आवश्यक आहे.




भविष्यात केवळ तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांनाच नव्हे, तर ज्ञानासोबत विवेक, नवकल्पनांसोबत करुणा आणि महत्त्वाकांक्षेसोबत प्रामाणिकपणा जपणाऱ्या व्यक्तींनाच अधिक महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करताना मानवी मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)