जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
कृषी

शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला, बांद्यात ‘कृषकव्हेंचर’च्या नव्या कार्यालयाचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन

दादा सारंग • 14 October 2026, 12:06 PM

बांदा प्रतिनिधी✍️ :शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल, घामाला समृद्धीचे फळ आणि कृषी उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळाली, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादनाचे सामर्थ्य आहे; मात्र त्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी सक्षम बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे. हाच ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न होऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.बांदा येथे कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कंपनीने सातत्याने कार्यरत राहावे, त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून द्यावी आणि शेती व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.कृषकव्हेंचरच्या बांदा येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते फीत कापून, तर भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह बांदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या हिताचा ध्यास; कृषी समृद्धीचा विश्वास यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी कृषकव्हेंचरच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांच्या उत्पादित मालाचे योग्य नियोजन करणे आणि बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळवून देणे, या उद्देशाने दयानंद कुबल यांनी कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना केवळ उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी सक्षम व्यवस्था निर्माण करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि शेतीतून अधिक चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी मदत करणे, या दृष्टीने कंपनीचे कार्य महत्त्वाचे आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)