कोल्हापूर प्रतिनिधी✍️: जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने जिल्हा परिषदेला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक ५४६९/२०२६ वर न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती नीरज पी. धोटे यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. दत्ता एच. पवार यांनी बाजू मांडली. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या हरकतींचा योग्य प्रकारे विचार न करता त्या फेटाळल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
२६ जून २०२० रोजीच्या शासन निर्णयातील (GR) कलम २० नुसार तक्रारींचा विचार करून त्यांचे निवारण करणे जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र किंवा कक्ष अद्याप कार्यरत नसल्याचा मुद्दाही सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आला.
या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या वतीने न्यायालयाकडून आवश्यक सूचना घेण्यासाठी वेळ मागण्यात आला. त्यानंतर खंडपीठाने जिल्हा परिषदेला आवश्यक माहिती व सूचना घेऊन, गरज असल्यास पुढील तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जिल्हा परिषदेचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांत आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.