जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

तुळस येथे २५ डिसेंबरला वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर व मनाचे श्लोक पठण स्पर्धा

दादा सारंग • 22 November 2026, 01:40 PM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यात वक्तृत्वकौशल्य, वैचारिक प्रगल्भता आणि संस्कारमूल्यांची जोपासना व्हावी, या हेतूने अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस यांच्या वतीने गुरुवार, २५ डिसेंबर २०२६ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खुली वक्तृत्व स्पर्धा, स्तोत्र पाठांतर स्पर्धा आणि मनाचे श्लोक पठण स्पर्धेचा समावेश आहे. प्रतिष्ठानकडून सलग तेराव्या वर्षी या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.




या स्पर्धा तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई यांच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात (श्री शिवाजी हायस्कूल, तुळस) सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहेत.




वक्तृत्व स्पर्धेसाठी पाणीटंचाई आणि संत गाडगेबाबा हे विषय




खुली वक्तृत्व स्पर्धा दोन गटांत घेतली जाणार आहे. इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'पाऊस भरपूर, तरी पाणीटंचाई का?' हा विषय निश्चित करण्यात आला आहे. तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून 'स्वच्छतेपलीकडचे संत गाडगेबाबा' हा विषय देण्यात आला आहे.




पहिल्या गटातील स्पर्धकांना आपले विचार मांडण्यासाठी ५ ते ६ मिनिटे, तर दुसऱ्या गटासाठी ६ ते ७ मिनिटांची वेळमर्यादा असेल. दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ९९९ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७७७ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५५५ रुपये, तर प्रत्येकी ३३३ रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्व विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.




स्तोत्र पाठांतर स्पर्धेत लहान विद्यार्थ्यांना संधी




विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत होईल. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत श्री गणपती स्तोत्र, तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री मारुती स्तोत्र पाठांतराचा विषय देण्यात आला आहे.




या स्पर्धेतील दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकाला ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकाला ६६६ रुपये, तृतीय क्रमांकाला ५५५ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाला ४४४ रुपये आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाला ३३३ रुपये अशी पारितोषिके आहेत. विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.




मनाचे श्लोक पठणातून संस्कारमूल्यांची रुजवणूक




समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक यांच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोकांपैकी पहिले २५ श्लोक पाठ करून सादर करणे आवश्यक आहे.




ही स्पर्धा वैयक्तिक स्वरूपाची असून, श्लोक पठण करताना कोणत्याही पुस्तकाचा किंवा कागदाचा आधार घेता येणार नाही. श्लोकांचे स्पष्ट व शुद्ध उच्चार, लय, ताल, सादरीकरण आणि आत्मविश्वास या निकषांवर परीक्षकांकडून गुणांकन केले जाईल. पठण करताना चूक झाल्यास गुण कमी केले जाणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.




या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ९९९ रुपये, द्वितीय क्रमांकाला ७७७ रुपये, तृतीय क्रमांकाला ५५५ रुपये, तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी ३३३ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.




शाळेचे ओळखपत्र किंवा शिफारसपत्र आवश्यक




या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र किंवा शाळेकडून देण्यात आलेले शिफारसपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. स्पर्धांची अधिक माहिती व नावनोंदणीसाठी वक्तृत्व स्पर्धेकरिता वैष्णवी परूळकर (७९७२१९३०३८), तर स्तोत्र पाठांतर आणि मनाचे श्लोक पठण स्पर्धेसाठी सानिया वराडकर (८६९८६९२६२३) यांच्याशी संपर्क साधावा.




विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)