जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

ठाकर लोककलेच्या रंगाविष्काराने पिंगुळी कला महोत्सवाची दिमाखदार सुरुवात!

दादा सारंग • 08 November 2026, 03:36 AM

कुडाळ प्रतिनिधी✍️ : ठाकर समाजाच्या समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या पिंगुळी कला महोत्सवाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पारंपरिक लोककलांच्या विविध सादरीकरणांनी पहिल्याच दिवशी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.




ठाकर समाजाच्या पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन व्हावे, त्यांना व्यापक व्यासपीठ मिळावे तसेच हा अनमोल सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.




उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे, सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा नाट्यकर्मी विजय चव्हाण, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संदीप बळवडे, सरपंच अजय आकेरकर, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष शशांक आटक, उपसरपंच मंगेश मसके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भगवान रणसिंग, समन्वयक मंगेश खरात, चेतन गंगावणे, एकनाथ गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.




यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना राज्यासह राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख आणि प्रतिष्ठा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.




नाट्यकर्मी विजय चव्हाण यांनी पिंगुळीची ठाकर लोककला ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे सांगितले. अशा सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून पारंपरिक कलांना सादरीकरणाची संधी मिळते. त्याचबरोबर नव्या पिढीला आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरांची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही घडते, असे त्यांनी स्पष्ट केले.




महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले ते विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण. दोडामार्ग-कोनाळकट्टा येथील राधानृत्य, महिलांची फुगडी, कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल, पिंगुळी-मालवणी गोंधळ आणि चित्रकथी अशा लोककलेच्या विविध प्रकारांनी उपस्थितांना एक वेगळाच सांस्कृतिक अनुभव दिला. या कलाविष्कारांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कलाकारांचे कौतुक केले.




दरम्यान, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (७ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता कळसूत्री बाहुल्या आणि अन्य पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




पिंगुळीच्या मातीत अनेक पिढ्यांपासून जतन झालेल्या ठाकर लोककलेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)